औंध ग्रामीचा डोंगर चढुनी आले गडावर या ,
भेटीस जाण्या त्रिगुणात्मक त्या माय यमाईला II
बालपणीची आठवण झाली पाहुनी आदिमाया ,
जीवन माझे कृतार्थ झाले करिता तुझी सेवा I
औंधासुर हा मर्दन करुनी आदिजगत जननी ,
शांत व्हावया औंधवासिनी बसली गडावरही II
मंदिरी तुझिया पाउल पडता अंतरी वास तुझा,
नतमस्तक हे क्षणात झुकले मंगलचरणी तुझ्या II
तव पूजेने कर हे माझे आज पुनीत होती,
भावफुलाची गुंफुनी माला घालीत तव कंठी
मनात चिंतन तुझे निरंतर चित्त तुझे ठायी II
विश्वव्यापीनी नाम तुझे गे गाते वैखरीही,
दो नेत्राच्या तेजदीप्तीने करिते आरती मी ,
अहंकार हा झाडूनी सगळा भरिते ओटीला II
पतितपावन श्रीरामाला दर्शन तू देसी ,
औंध नृपतीच्या भक्तीसाठी औंध ग्रामी येशी II
त्या भक्ताचे संकट हरुनी तया भगिनी होसी ,
प्रसूती समई सुईण होऊनी पत्नी सोडविसी II
बाळाचे ते नाम ठेविसी परशुराम तथा,
औंध ग्रामीचा पुण्यपुरुष हा वंदित तव पाया II
like like like!
ReplyDelete