हे गांव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नगर, सोलापुर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेनजिक असे आहे.साधारणपणे दिड हजार वर्षापुर्वी हे क्षेत्र वसलेले असावे; परंतु इ.स.७०० पासुन पुढचीच माहीती इतिहासात मिळाली आहे.
दक्षिण भारताच्या धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. जगदंबेचे स्वयंभु स्थान असलेल्या या तीर्थ क्षेत्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहासही बोलका आहे. अष्टभुजा देवीने महीषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला.या घटनेचा राशीनच्या स्वयंभु देवतांशी संबंध जोडला जातो. श्री क्षेत्र राशीन हे श्री येमाई देवीचे स्वयंभु स्थान आहे असे मानले जाते. या देवीला कुणी रेणुका देवी म्हणतात, तर कोणी येमाई देवी म्हणतात. सरकार दप्तरी मात्र श्री जगदंबा देवी असेच स्थानाचे नांव प्रचलित आहे. परंतु मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर जो शिलालेख आहे, त्यावरील नोंदीवरून श्री येमाईदेवी हाच उल्लेख बरोबर असल्याचे मानले जाते. देवळात ज्या पारंपारीक आरत्या म्हटल्या जातात त्यामध्येही श्री यमाई देवी असाच उल्लेख आढळतो. या नावाला प्रभु रामचंद्राच्या अख्याइकेचाही संदर्भ आहे. सीतामाईला रावणाने पळवुन नेले. सीतेला पाहण्यासाठी प्रभु रामचंद्र वेडे पीसे झाले होते. त्यावेळी रामाची गंमत करण्यासाठी पार्वती देवीने सीतेचे रूप धारण केले पार्वती सीतामाईच्या रूपात रामापुढे उभी राहीली, त्यावेळी प्रभु रामचंद्राने त्यांना येमाई अशी हाक मारली. त्यावरुनच राशीनच्या देवीला येमाई असे म्हणतात. अशी एक अख्याईका ऎकायला मिळते. या देवीचे मुळ ठिकाण मानले जाते. देवीची मुर्ती चतुर्भुज असुन ती स्वयंभुच उभी आहे.
असे मानले जाते. दोन्हीच्या मध्यभागी श्री चतु:श्रुंगी देवीची तांब्याची चलमुर्ती आहे. स्थानिक लोकांकडुन जी माहीती मिळते,त्यानुसार राशीन येथील देवीचे स्थान १३०० वर्षापुर्वीचे आहे. असे मानले जाते. राशीन गांवाचे रचनेच्या द्रुष्टीने दोन भाग पडतात. पहीला भाग पश्चिमकडील आणि दुसरा भाग पुर्वेकडील. पश्चिमेकडील भागात जुन्या गढ्यांची वबुरूजांची अवशेष आढळतात. निजामशाही मोगलशाही व पेशवाई या कालखंडात राशीनचे अस्तित्व वेगवेगळ्या घटनांवरून दिसुन येते. इ.स.७०० मध्ये विनयादित्य चालुक्याने कोरलेला ताम्रपट व इ.स.८०७ मध्ये राष्ट्रकुट गोविंद तिसरा यांनी घडविला. ताम्रपाट यामध्ये राशीनचा "भुक्ती" असा उल्लेख केलेला आहे. राशीनच्या या इतिहासाचे सर्वात जुने पुरावे मानले जातात. सातव्या शतकात राशीनला दक्षिण भारताच्या इतिहासात स्थान होते.तत्पुर्वीच हे गांव वसलेले असावे. बदामी चालुक्याच्या कालावधी नंतर मात्र राशीनचे फारसे उल्लेख सापडत नाहीत. यादवांच्या अस्तापर्यंत मानाचे स्थान असावे असे म.ना.रेणुकर या अभ्यासकाने म्हटले आहे.मधल्या निजामशाहीत राशीनचे उल्लेख अद्याप मोठे सापडत नाहीत. निजामशाहीच्या अस्तानंतर मात्र दक्षिणेत मोगलांचा पुर्ण अंमल होता. त्याकाळात राशीनचे महत्व वाढल्याचे आढळते या गांवाची पाटीलकी भोसले घराण्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलत बंधु शरीफजी भोसले यांचे ते वंशज आहे. शरीफजी आणि त्यांचा मुलगा त्रिंबकजी हे औरंगजेबाच्या नोकरीत होते. औरंगजेबने त्यांची रवानगी भिवर थडीवर केली तेव्हापासुन हे घराणे येथे स्थायिक झाले. देवळाच्या उत्तरेकडील शरीफजी, त्र्यंबकजी व त्यांच्या पत्नीची समाधी आहे. त्यावरून ही राशीनची ऎतिहासिक व त्याकाळचे राजकीय महत्व लक्षात येते. राशीन जवळ औरंगपुर नावाची पेठ वसविण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला होता. ती पेठ आज मंगळवार पेठ म्हणुन ओळखली जाते. देवीच्या मंदिराभोवतालचा जुन्या औरंगपुर मध्ये समावेश होत होता. फितुर कवी जंग यांचे राशीन हे जहागिरीचे गांव होते. त्यानंतर राशीनसह आसपासचा परीसर मराठ्यांच्या ताब्यात गेला. पेशवाईतील मुत्स्स्द्दी अंताजी माणकेश्वर यांची राशीनची देवी ही कुलस्वामींनी होती देवीच्या क्रुपेने अंताजींना वैभव व किर्ती लाभली. त्याबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी मंदिराच्या पश्चिमेला ओवरया बांधल्या. यावरील मराठी व एक संस्कृत असे दोन शिलालेख आहेत. त्यावर अंताजी माणकेश्वर यांचे नांव आहे. देवीच्या पुजेसाठी श्रीमंत पेशव्यांनी जमिनी इनाम दिल्या. हे त्यावेळच्या आकडे वारीवरून दिसते. त्याकाळातील जमिनीचा उतारा थोडासा जीर्ण झालेल्या अवस्थेत सापडला आहे. अशी माहीती म.ना.रेणुकर यांनी जाहीर केली आहे. इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी मंदिराच्या उत्पत्ती बाबत लिहुन ठेवले आहे. युध्दामध्ये दैतांना यमलोकाला पाठविणारी देवता म्हणजे येमाईदेवता आणि ज्या गांवी दैत्यांचा म्रुतदेहाचा राशी पडल्या ते राशीन गांव. असे पोतदार यांनी म्हटले आहे. मंदिराचे बांधकाम व शिल्प पाषाणात आहे. तेथे लाकडाचा मागमुसही सापडत नाही. देवता स्वयंभु असल्याने ती तांदळाच्या स्वरूपात आहे. तेथे नवरात्र अष्टमीच्या दिवशी मुख्य यात्रा भरते त्यावेळी देवीचे भळांदे निघते. एका मातीच्या कलशात ओटीचे सामान म्हणजे खण नारळ, बांगड्या, हळद कुंकु इ. साहीत्य घालुन सरकी पसरली जाते. नंतर ते पेटविले जाते त्यालाच भळांदे हे नाव आहे. राशीनचे आणखी वैशिष्ट्ये म्हणजे इस्लाम धर्मियांची साठ घरे आहेत. हे लोकही घटस्थापना करतात व रेणुका मातेला भजतात. यात्रेचे कामात उत्साहात भाग घेतात. अशी माहीती दत्तो वामन पोतदार यांनी लिहुन ठेवली आहे.